लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली   

पुणे : विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे तडजोडीत निकाली काढण्यात आले. या दाव्यातून १८३ कोटी ४५ लाख ५९ हजाराची भरपाई वसूल करण्यात आली. न्यायालयात दाखल, तसेच दाखलपूर्व दाव्यांची संख्या वाढत असल्याने न्यायव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.अनेक दावे एकाचवेळी तडजोडीत निकाली काढता येते. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणाकडून नियमित लोक अदलात उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. 
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दावे निकाली काढण्यासाठी १२३ पॅनेलची नेमणूक करण्यात आली होती. या पॅनेलसमोर दाखलपूर्व आणि प्रलंबित, असे एकूण मिळून दोन लाख दोन हजार ४० दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये ६० हजार ९० दाखलपूर्व आणि २६ हजार ४५२ प्रलंबित दाव्यांचा देखील समावेश आहे.
 
फौजदारी, दिवाणी, वीजबिले, कामगार वाद, मोटार अपघात दावे, भूसंपादन, वैवाहिक दावे, धनादेशाचे उल्लंघन, महसूल, वीजबिल व पाणीपट्टीची थकबाकी अशा दाव्यांचा यात समावेश आहे. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमित लोक अदालतीचे आयोजन केले जाते, असे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी नमूद केले.

Related Articles